१ डिसेंबर भारतीय नौदल दिन१ डिसेंबर भारतीय नौदल दिन 


भारतीय नौदलाची स्थापना इंग्रजांच्या काळात दि. ४ डिसेंबर १९९२ रोजी झाली.वास्तविक पाहता ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वखारीच्या रक्षणासाठी सन  १६१३ मध्ये सुरत येथे ' रॉयल इंडियन मरीन' म्हणून लढाऊ जहाजांचा ताफा उभारला होता. हा ताफा सन  १६६५ मध्ये मुंबई बंदरात हलविण्यात आला,तेव्हा  त्याला ' बॉंम्बे मरीन ' असे म्हणत असत. सन  १८९२ मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला व त्याला पूर्वीचेच ' रॉयल इंडियन मारिन' (शाही हिंदी नौकादल) असे नाव देण्यात आले.  ऑक्टोंबर १९३४ रोजी पुन्हा या नौदलाचा मोठा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आणि या नौदलाचे नाव 'रॉयल इंडियन नेव्ही ' असे ठेवण्यात आले. दि. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र झाले व तेव्हा या नौदलाच्या नावातील 'रॉयल'(शाही) हा इंग्रजांची निशाणी असलेला शब्द गाळण्यात येऊन फक्त 'इंडियन नेव्ही' (भारतीय नौदल) असे नाव त्याला आपण दिले.

दुस-या महायुद्धाच्या काळात (सन १९३७ ते १९४५) या नौदलातील अधिक-यांची व नाविकांची संख्या तीन हजार होती. सन  १९४७ साली भारताची फाळणी होऊन या नौदलाचा तिसरा हिस्सा व तीन प्रशिक्षण केंद्रे पाकिस्तानला मिळाली. उरलेल्या अपू-या व विस्कळीत नौदलाची पद्धतशीर उभारणी केंद्र सरकारने त्यानंतर अवघ्या वीस वर्षात केली व आपले नौदल समर्थ बनविले.

सध्या  आपल्या  नौदलात  विमानवाहू नौका ,संरक्षक नौका, पाणबुडी पथक,सागरी निरीक्षण कारणा-या नौका,क्षेपणास्त्रधारक होड्यांचे पथक,किना-यापर्यंत पोहोचविणारे तराफा पथक,विमानवेधी लढाऊ नौका,पाणबुडीची सुटका करणारी नौका,पाणबुडी  विरोधी लढाऊ नौका,बहुउपयोगी लढाऊ नौका,अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी,विनाशिका ,सुरुंग नाशक नौका,गलबतांना ओढून आणणारी नौका,टेहळणी करणारे तुफानी तराफे ,दुरुस्ती नौका,सहायक तराफे,नौकांचा एवढा मोठा संच आपल्या नौदलाचा आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी कार्य कारणा-या हेलिकॅप्टरचे पथकही आहे. आपल्या नौदलाचे पश्चिम कमांड (मुंबई),पूर्व कमांड (विशाखापट्टण) व दक्षिण कमांड (कोचीन) असे तीन प्रमुख विभाग आहेत. पश्चिमी आरमार व पूर्वी आरमार असे दोन गट आहेत. आपले नौदल हे जगातील सातव्या क्रमांकाचे नौदल असून भारत-पाक युद्धात या नौदलाने फार मोलाची कामगिरी बजावलेली आहे. विस्तीर्ण सागरी किना-याचे रक्षण आपले नौदल करीत आहे. दरवर्षी १ डिसेंबर रोजी सा-या नौकांवर रोषणाई केली जाते आणि नौदल आपला वाढदिवस साजरा करीत असते. त्यावेळी बंदर बंदरातून हजारो प्रेक्षक जमतात.